September 8, 2024

ppr

अन्यायाचा प्रतिकार करणे हा सर्वांचा अधिकार – वपोनि. तय्यब मुजावर स्वेरीत ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ उपक्रम संपन्न

Spread the love

पंढरपूर- प्रतिनिधी

‘विद्यार्थिनींनी सोशल मीडियाचा वापर फक्त अभ्यासापुरताच करावा, मोबाईल वापराचा अतिरेक टाळावा, यामुळे नकळत अप्रिय घटना घडू शकतात. आपल्या महाविद्यालय परिसरात एखाद्या विद्यार्थिनीला असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा. त्यांच्यामार्फत आमच्यापर्यंत सुचना येतात. आपल्याला होणाऱ्या त्रासापासून ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ वाचवू शकतात. कुठे अन्याय होत असेल त्याला प्रतिबंध करावा. अन्यथा मोठी घटना घडू शकते. छोटी छोटी कारणे दुर्लक्षित केल्याने भविष्यात मोठी घटना घडू शकते. यासाठी अन्यायाच्या विरोधी उभे राहा. समाजकंटक, गुंड, अन्याय करणारा कोणीही असो त्याच्या विरुद्ध तक्रार द्या. आपले नाव देखील गुप्त ठेवले जाते. कारण अन्यायाचा प्रतिकार करणे हा सर्वांचा अधिकार आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी व्यक्त केले.
समाजामध्ये आपण पोलिसांकडे आदरयुक्त भीतीने पाहतो. आपल्यावर होणारा अन्याय सहन करण्यापेक्षा पोलिसांकडे तात्काळ धाव घेतल्यास अनेक अप्रिय घटना सहज टळू शकतात. फसवणूक, ठकसेन, रोडरोमियो यांच्यामुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन सोलापूरचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे ठकसेन, रोडरोमियो, ठग, गुंड यांच्या साम्राज्याला पोलीस खात्याकडून चांगलाच चाप बसला आहे. याच ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ उपक्रमाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वेरीत आले होते. याप्रसंगी व.पो.नि.मुजावर हे विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक मुजावर पुढे म्हणाले की, ‘आपल्याला जर असुरक्षितता वाटत असेल, आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरोधात आवाज उठविणे हा आपला अधिकार आहे. स्वेरी कॉलेज हे आदरयुक्त व शिस्तीचे महाविद्यालय म्हणून राज्यात सर्वश्रुत आहेच पण कोणी विद्यार्थिनी पंढरपूर शहरातून अथवा लगतच्या गावातून घर ते कॉलेज प्रवास करत असताना कोणी अनोळखी, समाजकंटक यांच्याकडून ब्लॅकमेलिंग होत असेल, एसएमएस, मोबाईलद्वारे, सोशल मीडिया द्वारे त्रास देत असेल, अश्लील शब्द वापरत असेल, तर बिलकुल अन्याय सहन करू नका. त्याच्याविरुद्ध आमच्याकडे नि:संकोच तक्रार द्या. तातडीने प्राचार्य डॉ. रोंगे सर, डॉ. पवार सर, प्रा.पाटील सर तसेच जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. आपण आता अठरा वर्षाच्या पुढे आहात. त्यामुळे स्वतःची व आपल्या मैत्रिणीची आपणच काळजी घ्यावी. ‘घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटनेपुर्वीच काळजी घ्या’ त्यातूनही जर असुरक्षितता वाटत असेल, अन्याय होत असेल तर अशा विद्यार्थीनींनी सरळ पोलिसांकडे तक्रार करावी.’ असेही आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब माने, पोलीस उपनिरीक्षक वडणे तसेच पोलीस दिदी तथा महिला पोलीस कर्मचारी जाधव, मणेरी, कदम व राऊत हया देखील उपस्थित होत्या. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे ‘पोलीस दिदी आणि पोलीस काका’ यांनी स्वेरीतील विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधून महत्त्वाचे कानमंत्रही दिले. या कार्यक्रमाला स्वेरीच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वेरीला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले असून मुलींसाठी विशेष सुरक्षा असल्यामुळे राज्यातील पालकांचा आपल्या मुलींना स्वेरीत प्रवेश कसा मिळेल याकडे अधिक कल असतो. स्वेरीच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत पण पंढरपूर व लगतच्या गावातून कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थिनींचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाने आत्मविश्वास वाढला, हे मात्र नक्की. संवाद व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.