पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या सेवेच्या संस्कारातून नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे आणि पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त व्हावा, या संकल्पनेतून यंदाच्या वर्षी तब्बल १० हजार नागरिकांना मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहिती पांडुरंग परिवाराचे युवानेते प्रणव परिचारक यांनी दिली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच करकंब ग्रामीण रुग्णालय येथे मोतीबिंदू तपासणी, लेन्ससह शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. करकंब, कासेगाव, रोपळे, तुंगत, पुलुज, खर्डी, रांजणी, गादेगाव, उंबरे पागे आणि भाळवणी आदी ठिकाणी ही शिबिरे घेण्यात आली.
या शिबिरांना माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या अभियानाला पाठिंबा दिला.
पुणे येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयाच्या अंतर्गत शंकरराव साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची नेत्र तपासणी केली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत ४ हजार ३९० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे २ हजार १०० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत.
गेल्या सहा वर्षांत प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध शिबिरांमध्ये तब्बल ८ हजार ९०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यंदाच्या शिबिरातील रुग्णांची संख्या धरता हा आकडा सुमारे १० हजारांपर्यंत पोहोचणार असून, पंढरपूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिनाटाक्याची, लेझर तंत्रज्ञानावर आधारित लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागरिकांना मोफत करून दिली जाणार आहे. यासाठी रुग्णांना त्यांच्या गावातून सोलापूर आणि पुणे येथील रुग्णालयात ने-आण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुढील दीड ते दोन महिन्यांत शिबिरांमध्ये पात्र ठरलेल्या सुमारे २ हजार १०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राबविण्यात आलेल्या या आरोग्य अभियानातून पंढरपूर तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम उभा राहत असल्याचे चित्र आहे.
मोतीबिंदूमुक्त पंढरपूर तालुक्यासाठी यंदा १० हजारांपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया : प्रणव परिचारक
More Stories
पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
वाढदिवसा दिनीही विकासकामांनाच प्राधान्य; पंढरीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरा
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची निवड पक्षाच्या जम्बो कार्यकारणीत पंढरपूरच्या नेतृत्वाला संधी