पंढरपूर – प्रतिनिधी
वर्षानुवर्षे सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा नाताळच्या आदल्या रात्री छोट्या छोट्या मुलांना भेट वस्तू देते. ज्या मुलांना पालक आहेत त्या मुलांना ती हमखास मिळतेच पण ज्या मुलांना पालक नाहीत आणि जी मुले अनाथ आहेत अशा छोट्या छोट्या मुलांसाठी, त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कर्मयोगीच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चला बनवूया सांताक्लॉज या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे निव्वळ संपूर्ण शाळेनेच नाही तर समाजातील इतर ही दानशूर व्यक्तींनी अनेक छोट्या मोठ्या वस्तू भेट देऊन आणि अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद आणून अतिशय हृदयस्पर्शी दाद दिली आहे.अशा रीतीने कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये आगळावेगळाच ख्रिसमस साजरा झाला.
आपण सर्व विद्यार्थीही सांताक्लॉजच्या रूपाने गरजू व अनाथ मुलांना भेटवस्तू देऊ शकतो. ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या समोर मांडली गेली व या कल्पनेला सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनाथ मुलांना सांताक्लॉज हा फक्त स्वप्नच वाटत असतो. परंतु आपण हा सांताक्लॉज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू. अशी मुलांना साद घालताच सर्व विद्यार्थ्यांनी भेटवस्तू जमा करून आज ख्रिसमस डे च्या निमित्ताने अनाथ मुलांसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा या ख्रिसमस डे चे आयोजन कर्मयोगी विद्यानिकेतन तर्फे करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनून त्यांच्याबरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक श्रीपाद याळगी यांनी सांताक्लॉजची वेशभूषा केली होती. त्याचबरोबर प्रशालेच्या सर्व शिक्षिकांनी सांताक्लॉज चे गाणे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या भेटवस्तू एकत्र मांडून सर्व विद्यार्थ्यांचा त्यासोबत फोटो घेण्यात आला. या उपक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी अतिशय मनापासून भेटवस्तू पाठवल्या. ‘आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचे काम प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हा आगळावेगळा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आपण सर्वच जण समाजाचे देणे लागतो आहोत त्यामुळे असे उपक्रम नेहमीच विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी भावना संस्थेचे चीफ ट्रस्टी माननीय श्री. रोहन परिचारक यांनी व्यक्त केले. प्राचार्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
More Stories
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ
स्वेरीच्या अवंतिका आसबे यांची ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड
स्वेरीच्या स्वराली जोशी यांची ‘इंटेलीपॅट’ या कंपनीत निवड