October 15, 2024

ppr

विद्यार्थीनींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

स्वेरीमध्ये विद्यार्थीनींच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन सत्र संपन्न

पंढरपूर- ‘कुटुंबातील प्रापंचिक धांदलीमुळे महिला आपल्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत. महिला जशा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात तशीच काळजी महिलांनी आपल्या स्वत: च्या शरीर प्रकृतीची घ्यावी. महिलांच्या तब्बेतीविषयीच्या संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाब, अनियमित मासिक पाळी अशा विविध तक्रारी असतात. विद्यार्थीनींनी व महिलांनी आपल्या शारीरिक आजारांविषयी जागरूक राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थीनींनी व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटलच्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी केले.     

               डॉ. बी.पी.रोंगे हॉस्पिटल, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटलच्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे ह्या मार्गदर्शन करत होत्या. या मार्गदर्शन सत्राचा फायदा स्वेरी संचलित पदवी अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी, पदवी फार्मसी व पदविका फार्मसी मधील विद्यार्थीनींना व प्रध्यापिकांना झाला. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी हे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यामागचे कारण स्पष्ट केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे पुढे म्हणाल्या की, ‘मासिक पाळी हा सर्व विद्यार्थिनी व महिला वर्गासाठी मोठा प्रश्न आहे. त्याविषयी आपल्या समाजात खूप  गैरसमज आहेत. पिरिअडच्या कालावधीत देवाला शिवायचे नाही, स्वयंपाक करायचे नाही, बाहेर बसणे, या गोष्टी पहायला मिळतात. पूर्वापार चालत आलेली ही एक प्रथा आहे. विशेष म्हणजे त्यामागे कोणतेही लॉजिक नाही. मासिक पाळी पुढे जावी म्हणून गोळी घेतली जाते. अशा गोळ्या वारंवार घेण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधांचा वापर शक्यतो टाळावा. पिरिअड चालू असल्यामुळे अशक्तपणा, कमजोरपणा जाणवतो, यासाठी फळे आणि ताज्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. एकूणच सकस आहार घेतला पाहिजे. आजकाल विद्यार्थिनी फास्टफूड खाणे पसंत करतात पण ते टाळणे गरजेचे आहे. या काळात आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी तसेच स्वच्छता विषयक बाबींचा सर्वांनी अवलंब करणे आवश्यक आहे.’ असे सांगून डॉ.स्नेहा रोंगे यांनी विद्यार्थिनींना आरोग्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांनी पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनुभव घेवून आता त्या ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देत आहेत. डॉ. स्नेहा रोंगे या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ असून त्या स्वतः एमबीबीएस, एमएस (ओबीजीवाय) असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले आहे. लॅप्रोस्कोपी एक्सपर्ट व इन्फर्टीलिटी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉ.स्नेहा रोंगे यांची सेवा पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांना उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागामध्ये सहसा कोणताही आजार झाला तर त्या रुग्णांना मोठमोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते आणि वेळेअभावी योग्य उपचार घेण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे रुग्णांची  प्रचंड धावपळ होते. हे लक्षात घेऊन मोठ्या शहराऐवजी पंढरपूरमध्येच या हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मार्गदर्शन सत्रानंतर विद्यार्थीनींनी आरोग्याविषयी प्रश्न विचारले असता डॉ. रोंगे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी प्रा. वसेकर, प्रा.रेश्मा मालगोंडे, प्रा.माधुरी पवार, प्रा.निशिगंधा महामुनी, प्रा.चैताली अभंगराव, प्रा.तेजस्विनी गोडसे आदी प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.