September 8, 2024

ppr

निरामय आरोग्य हिच खरी संपत्ती
-योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी

Spread the love

स्वेरीत ‘स्वानुभाव योगधाम शिबिरा’चे उदघाटन

पंढरपूर- ‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपले नैसर्गिक जीवन जगणे विसरत चाललेला आहे त्यामुळे आज अनेक जण मधुमेह, रक्तदाब अशा विविध व्याधींना तोंड देत आहेत. एकीकडे मुबलक पैसा तर दुसरीकडे शरीर साथ देत नाही अशी अनेकांची अवस्था झाली आहे. यासाठी वेळेवर जेवण, भरपूर झोप आणि निर्व्यसनी असण्याची गरज आहे. दैनंदिन जीवन जगत असताना आपण नियमाच्या बाहेर पाऊल टाकत आहोत. त्यामुळे आरोग्याचा समतोलपणा ढासळत असून स्वतःच आजारास निमंत्रण देत आहोत. म्हणून निरोगी जीवन जगण्यासाठी नैसर्गिक आहार, नित्य प्राणायम यांची गरज आहे. एकूणच निरामय आरोग्य हिच खरी संपत्ती आहे.’ असे प्रतिपादन कोल्हापुरातील प्राचीन भारतीय संस्कृती विद्याकेंद्राचे प्रमुख योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये स्वेरी संचलित चारही महाविद्यालयांमधील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत ‘स्वानुभाव योगाधाम शिबिर’ या पंधरा दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. याच्या उदघाटन प्रसंगी योगाचार्य नारायण गुरुजी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल (आयक्युएसी) चे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर यांनी प्रास्तविकात ‘विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना शिक्षकांची शारीरिक व मानसिक क्षमता देखील उत्तम राहावी यासाठी स्वेरीतर्फे दरवर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यंदा स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वेरीमध्ये स्टाफसाठी हे पंधरा दिवसीय ‘स्वानुभव योगधाम शिबिर’ दि.१८ फेब्रुवारी ते दि.५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.’ असे सांगून त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. स्वेरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजिलेल्या या शिबिरामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी या शिबिराच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक क्षमतांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून आजच्या धकाधकीच्या जीवनात हे शिबीर फायद्याचे ठरणार आहे. वाढलेले वजन कमी होण्यासाठी देखील या शिबिराचा फायदा होणार आहे. या पंधरा दिवसीय शिबिरात योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी हे दररोज सकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत प्राणायम करून घेणार असून अन्नमयकोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष या पाच प्रकारचे कोष शुद्ध करून घेणार आहेत तसेच स्टाफचे मनोबल व उत्साह वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आपल्या शरीरातील सर्व अवयव, उद्भवणारे आजार, प्राणायाम, आहार यांबाबत मार्गदर्शन देणार आहेत. पहिल्याच दिवशी यकृत, स्वादुपिंड, बद्धकोष्टता यावर व जीवनात उत्साही व आनंदी राहण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी वेनुनगर, गुरसाळे येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, अभिषेक सातारकर, नवीन साळुंखे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

छायाचित्र- स्वेरीमध्ये ‘स्वानुभाव योगाधाम शिबिर’ चे उदघाटन करताना कोल्हापुरातील प्राचीन भारतीय संस्कृती विद्याकेंद्राचे प्रमुख योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी सोबत डावीकडून डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, यावेळी वेनुनगर, गुरसाळे येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, अभिषेक सातारकर, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार आणि नवीन साळुंखे.