July 1, 2025

ppr

सभासदांची दिवाळी होणार गोड; भीमा देणार २० रुपये प्रति किलोने साखर – चेअरमन विश्वराज महाडिक

Spread the love

मयत सभासदांच्या वारसांना सुद्धा दिवाळी साखर; फक्त सभासदांसाठी २५ किलोचे बॅग पॅकिंग

(टाकळी सिकंदर) – भीमा सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी प्रमाणे दिवाळीसाठी सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते यावर्षी २० रुपये प्रति किलो दराने साखर वाटप सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारख्यान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. साखर वाटपात सुलभता येण्याकरता फक्त सभासदांसाठी २५ किलो साखरेचे बॅग पॅकिंग करण्यात आले आहे. तसेच सभासदांमध्ये कोणताही भेदाभेद न करता मयत सभासदांच्या वारसांसह सर्वच सभासदांना दिवाळी साखर देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील विश्वराज महाडिक यांनी दिली. साखरेचा जागतिक बाजारपेठेतील व देशातील विक्री दर वाढले असल्याचा दाखला देत जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांकडून सभासद साखर २५ ते ३० रुपये किलो दराने दिली जात आहे. अशा वेळी चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सभासदांशी असणारा ऋणानुबंध जपत २० रुपये प्रति किलो दराने साखर देत सर्वांसमोरच एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अगदी चेअरमन पदाची जबाबदारी मिळाल्यापासूनच विश्वराज महाडिक यांनी अनेक सभासद हिताचे निर्णय घेत आपल्या कार्यशैलीने सर्वांनाच आश्वस्त केले आहे. यावेळी विश्वराज महाडिक यांनी इतर कारखान्यांच्या तुलनेत सभासदांना ५ ते १० रुपये स्वस्तात साखर उपलब्ध करून देत दिवाळीचा गोडवा तर वाढवला आहेच पण होऊ घातलेल्या हंगामापूर्वी चांगलीच साखरपेरणी देखील केली आहे. आपल्याच ऊसापासून तयार झालेली गोड साखर आपल्या घरचा दिवाळी फराळ गोड करणार या भावनेतूनच यावर्षीचा ऊस देखील सभासद भीमालाच गाळपास देणार असा आशावाद देखील विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. यावर्षी ऐन नवरात्रोत्सवातच दिवाळीसाठी देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप करण्यात येत आहे. सर्व सभासदांसोबतच मयत सभासदांच्या वारसांना देखील दिवाळी साखर वाटप करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सभासदांना साखर घेऊन जाणे आणि कर्मचाऱ्यांना वाटप करणे सोप्पे जावे यासाठी प्रथमच भीमाकडून खास सभासदांसाठी २५ किलो साखर बॅगचे पॅकिंग करण्यात आले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गट ऑफिसवर बुधवार दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधी मध्ये सकाळी १० ते सायं ५ या वेळेत सभासद साखरेचे वाटप केले जाणार आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वच सभासदांनी दिवाळी साखर संबंधित गट ऑफिसवरून घेऊन जाण्याचे आवाहन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केलं आहे.

चौकट –

सभासद हाच सहकारी संस्थेचा खरा मालक असतो. संचालक मंडळ व चेअरमन त्या संस्थेचा विश्वस्त असतो. भीमा परिवाराने नेहमीच हा विचार जपला आहे. सभासद केंद्रस्थानी मानूनच हा निर्णय घेतला आहे. यापुढे देखील कायमच सभासद हिताला प्रथम प्राधान्य राहील. – चेअरमन विश्वराज महाडिक