November 21, 2024

ppr

भीमा कारखाना काटा चोख. पेमेंट रोख.. २४०० रुपये उचल.. कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी बोनस – चेअरमन विश्वराज महाडिक

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

भीमा सहकारी साखर कारखाना लि., टाकळी सिकंदर कारखान्याचा ४४ वा बॉयलर अग्नी प्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुरु होत असलेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल ५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा करत यावर्षी भीमा कारखान्याचा रोख काटा पेमेंटकडे आहे हे स्पष्ट केलं. तर कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत २४०० रुपये पहिली उचल जाहीर केली. चेअरमन विश्वराज यांनी पुढे बोलताना कारखाना कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी बोनस यासह १५ किलो साखर मोफत देणार असल्याची देखील घोषणा केली.

चेअरमन विश्वराज महाडिक यांनी काटा चोख असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस भीमा कारखान्यालाच घालवायचा असतो मात्र गेल्या काही वर्षांतील बिलाला होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी नाईलाजास्तव दुसरीकडे ऊस घालतात हे ओळखून यावर्षी काटा पेमेंट म्हणजेच ५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार असल्याची घोषणा केली. विश्वराज यांनी काटा पेमेंट देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत एकच जयघोष केला. भीमा कारखान्याचा अडचणींचा काळ संपला असून आता चांगला काळ सुरु आहे असं सांगत विश्वराज यांच्या ५ व्याच दिवशी बिलं जमा करण्याच्या निर्णयामागे त्यांचा अभ्यास, नियोजन याचा दाखला खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. “विश्वराज यांनी केवळ घोषणा केलेली नाही तर अगदी शेवटच्या आठवड्यात तुटणाऱ्या ऊसाचे पेमेंट सुद्धा ५ व्याच दिवशी मिळेल याच काटेकोर नियोजन केलेलं आहे. याकामात त्यांच्या शिक्षणाचा त्यांना फायदा होईल.” अशी खात्री खासदार महाडिक यांनी मार्गदर्शनपर बोलताना व्यक्त केली.

विश्वराज यांनी गिरवला आजोबांचा कित्ता

वार्षिक सर्वसाधारण सभेतील चिमणीच्या गोष्टीप्रमाणेच भीमाचा काटा चोख असल्याचा फायदा कसा होतो हे सांगण्यासाठी विश्वराज यांनी आबुराव – छबुरावची गमतीशीर तितकीच अर्थपूर्ण गोष्ट सांगितली. कारखान्याचे संस्थापक व आजोबा पैलवान भीमराव महाडिक हे देखील अनेक मजेशीर आणि बोधपूर्ण गोष्टी सांगत असत. आपल्या आजोबांचाच गोष्टी सांगण्याचा कित्ता गिरवत विश्वराज यांनी आबुराव आणि छबुराव या व्यापाऱ्यांच्या गोष्टीतून शेतकऱ्यांना काटामारीपासून सावध राहून चोख काटा असणाऱ्या भीमा कारखान्यालाच ऊस घालण्याचे आवाहन केले. आपले चुलत आजोबा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीचा दाखला देत विश्वराज यांनी बोलताना “मी तुमच्याप्रमाणेच कारखान्याचा एक सेवक आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा आहे” असा विश्वास कर्मचाऱ्यांना दिला.

यावर्षी देखील खासदार महाडिक यांनीच फोडली ऊस दराची कोंडी
राज्य सरकारने यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्यांना १ नोव्हेंबर पासून गाळपास परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही. खासदार महाडिक यांनी २४०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आणि ऊसदराची कोंडी फोडली.

चौकट –

उजनी पाणी पाळीचे नियोजनासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
यंदा पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा देखील कमी आहे. अशावेळी आत्ता लगेचच धरणातून पाणी सोडल्यास त्याचा अपव्यय होऊन काही दिवसांनी निकराची आवश्यकता असताना पाण्याची कमतरता भासेल. त्या ऐवजी उपलब्ध पाणीसाठ्यातूनच डिसेंबर आणि मार्च मध्ये पाणी आवर्तन आल्यास त्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी देखील उपयोग होईल. त्यासाठी पाणी पाळी विषयी आपण स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं.